Friday, June 29, 2012

२००५ च्या डिसेंबर मध्ये क्षितिज तर्फे सलग ७ दिवस गडावर माती सफाई चा कार्यक्रम आखला होता त्या निमित्त आठवडाभर मी गडावर होतो. त्यावर खालील लेख आधारित आहे…
                          
                                                                              “ वो सात दिन “

क्षितिज तर्फे सुधागड प्रकल्प राबविला जातो. प्रकल्पाच्या बैठकीमध्ये पुढची कामे ठरवली जातात. अश्याच एका बैठकीला आम्ही जमलो होतो. तेव्हा  महादरवाज्यातील माती सफाई चे काम चालू होते. शनिवार-रविवार जमेल तसे गडावर जाऊन माती सफाई चे काम चालायचे. बरीच चर्चा झल्यावर निष्कर्ष निघाला की एक मोठी धडक जर का या कामाला दिली तर काम पूर्ण होऊ शकते. आठवडाभर सलग काम करता येईल का यावर विचार चालू होता. गावातून मजूर आणायचे आणि इकडून जसे जमतील तशी मुले घेऊन जायची असे काहीसे साधारण ठरत होते.
गेल्या काही दिवसांपासून माझा ऑफीस मध्ये LTA घेण्याचा विचार सुरू होता. अचानक एक कल्पना सुचली,  LTA घेऊन गडावरच का जाऊन राहू नये ? दोन्ही उद्देश साध्य होणार होते. माझा LTA सुद्धा 'claim' होणार होता आणि श्रमदानाच्या कामाला सुद्धा मदत मिळणार होती. कल्पना बोलून दाखवली..सर्वाना पसंत पडली…झाले, मोहिम नक्की झाली. कालावधी ठरला ३१ डिसेंबर २००५ ते ८ जानेवारी २००६.
मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत बैठका मागून बैठका चालू होत्या.. आठवडाभर मी किल्ल्यावर ठाण मांडून बसणार होतो..रोज ८ ते १० मजूर ठाकूरवाडीतून किल्ल्यावर येणार, दिवसभर काम करून संध्याकाळी परत खाली जाणार. कामासाठी लागणारी घमेली, फावडी, कुदळ गडावरच्या वाड्यात होती..२,३ मोबाइल चे सेट मी ठेवायचे ठरले..कारण एक बॅटरी ८ दिवस पुरली नसती आणि बॅटरी चार्जिंग चा तर संबंधच नव्हता..रोज रात्री मुंबई ला फोन करून त्या दिवशी झालेल्या कामाचा आढावा घ्यायचा आणि काही हवे नको असल्यास त्याबद्दल चर्चा करायची…रोज जमेल तसे १,२ जण डोंबिवलीहून गडावर येणार होते..त्यांच्याबरोबर काही गोष्टी हव्या असल्यास मागावायचे ठरले…मजुरांची रोजच्या जेवणाची सोय गडावरच होणार होती…त्यासाठी ठाकूरवाडीतून एक ‘कुक’ गडावर राहणार होता..गावच्या भाषेत कुक ला ‘जेवण्या’ म्हणतात..धान्याचा साठा गडावर करून ठेवायचा आणि अजुन लागणार असल्यास गावातून मागवायचे ठरले.
प्रत्यक्ष तयारी ला सुरूवात झाली..डाळ,तांदूळ,तेल, मीठ, चहा पावडर अशी यादी करून पालीला धाडली…माझे ८ दिवसांचे कपडे, प्रथमोपचाराचे सामान ई. गोष्टी सॅक मध्ये जायला लागल्या..

अखेर तो दिवस आला..ठरल्याप्रमाणे आम्ही ४,५ डोकी शनिवारी गडावर पोचलो..मित्राना नवीन वर्षाच्या शुभेछा द्यायला फोन केला की त्याना आम्ही सांगायचो “ कॉलिंग फ्रॉम सुधागड सर ”. रविवारी आठवड्याभरच्या प्लॅन वरुन पुन्हा एकदा नजर मारली…डाळ, तांदूळ, मीठ, मिरची चा स्टॉक मजूर गडावर आणणार होते त्याप्रमाणे तो आला. गडावर गाई असल्यामुळे दूध भरपूर होते..सर्व काही व्यवस्थित प्लॅनिंग प्रमाणे होत होते..आता फक्त प्रत्यक्ष कामाला सुरूवात व्हायचा अवकाश होता…

वाड्यावरून भोराई कडे जाताना गुप्त दरवाजा लागतो. या गुप्त दरवाज्यासमोर डाव्या बाजूला एक बुरूज उतरत आलेला दिसतो.. त्या बुरुजावर आम्ही जाउन आलो. पायवाटेवर चांगलाच घसारा आहे. तसेच गुप्त दरवाज्याच्या उजव्या बाजूला ‘बोकडशीलेचा पहारा’ नावाचे पहार्‍याचे ठिकाण आहे..तिकडे बुरूज आणि पाण्याचे टाके आहे.. ठाकूरवाडीतला मंगेश नावाचा मुलगा (त्याला आम्ही मंग्या म्हणाय़चो) बरोबर होता..तो होता म्हणूनच आमची ही दोन्ही ठिकाणे पाहून झाली. रविवारी संध्याकाळी मझयाबरोबेर् आलेले गड उतरले…आता गडावर मी,मंग्या आणि मावशी च होतो…

सोमवार उजाडला…८ वाजता मजूर येणार होते..त्या प्रमाणे सगळे आटपून ८ पर्यंत तयार होऊन वाड्याबाहेर दगडावर बसून मजुरांची वाट पाहत होतो..पण साडे आठ झाले, ९ वाजले, १० वाजले…मजूर आलेच नाहीत..सराना फोन करून जरा चौकशी करायला सांगितले…मजूर खाली फंडच्या कामात असल्यामुळे आज येणार नव्हते..घोर निराशा झाली..सोमवार चा पहिला दिवस तसाच फुकट गेला..
मंगळवार उजाडला..पुन्हा एकदा ८ वाजता तयार होऊन दगडावर बसलो होतो..पण स्थिती कालचिच..कोणीच आले नाहीत..पुन्हा एकदा सराना फोन..समजले की आजही फंडचे काम असल्यामुळे मजूर येणार नाहीत.आम्ही थोडे वैतागलो होतो..येतो असे सांगून सुद्द्धा २ दिवस मजूर आले नाहीत..२ दिवस फुकट गेले होते..पण राग व्यक्त करून चालणार नवता कारण पुढचे ४ दिवस त्यांच्याकडुनच काम करून घ्यायचे होते...अखेर बुधवारी काम सुरू झाले..महा दरवज्यातुन बाहेर आले की वाट उतरत जाते.त्याच्या दोन्ही बाजूला खोलगट भाग आहे..पुर्वी गड जेव्हा वापरात होता तेव्हा पावसाचे पाणी वाटेवर न येता बाजूने वाहून जाण्यासाठी केलेली ती सोय होती…आता आम्ही दरवाज्यातील माती काढून या खोलगट भागात टाकणार होतो जेणेकरून जेव्हा पाउस पडेल तेव्हा पाण्याबरोबेर् ती माती वाहून जाईल…दरवाज्यापासून खाली उतारापर्यंत आम्ही  मानवी साखळी केली..सर्वात पहिला गडी घमेली भरून पुढच्या कडे द्यायचा..पुढचा त्याच्या पुढच्याकडे आणि त्याच्या पुढचा त्याच्या पुढच्याकडे..असे करत ती माती त्या खोलगट भागात येऊन पडायची…कामाला जोर पकडू लागला होता…काम करताना आमच्या गप्पा सुद्धा मस्त चालू असायच्या..हे गडी त्यांची गाणी म्हणायचे..ते ऐकायला खूप छान वाटायचे.. पहिल्या दिवशी अंदाजे २५० ते ३०० घमेली माती निघाली होती…काम समाधानकारक नव्हते पण सुरूवात तर झाली होती..मुंबईला कामाचे ‘रिपोर्टिंग’ झले…रात्री जेवण करून झोपी गेलो…
गुरुवारी सकाळी वेळेवर मजूर आले…ठरल्याप्रमाणे डोंबिवलीहून सुद्धा कुमक येत होती..आज आम्ही १४,१५ जण होतो..त्या दिवशी मस्त काम झाले…घमेली चा आकडा ८५० ते ९०० पर्यंत गेला होता…शुक्रवारी सुद्धा चांगले काम झाले…धान्याचा स्टॉक संपत आला होता…तो मागवून घेतला…गडी लोकांचे जेवण पाहिल्यावर अवाक् व्हायला होते…आपल्या दुप्पट, तीप्पट त्यांचे जेवण असायचे...रोजचा मेनु सुद्धा मस्त असायचा..कधी  खिचडी, कधी मस्त गरम गरम आमटी भात…दरवाज्यात पायर्‍यावर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो..तिकडेच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा कामाला सुरवात…
शुक्रवारी २ वेगळे अनुभव मिळणार होते…एका गड्याने मला विचारले की तुला रान मेवा खायचा आहे का ? म्हटल की कोनचा मेवा  सांगा की…संध्याकाळी त्यानी 'तो' मेवा दाखवला..करड्या रंगाचा चांगला भरलेला ससा पकडला होता…हे लोक रानात ससे पकडतात आणि खाली गावात जाऊन विकतात..ससा पकडण्यासाठी फासे कसे लावतात ते सुद्धा बघायला मिळाले…त्या दिवशी पहिल्यांदी ससा खाल्ला…आवडला… …आणखी फासे लावण्यासाठी त्या दिवशी मजुरांचा मुक्काम गडावरच होता… संध्याकाळी काम झाल्यावर वाड्यात आम्ही सगळे चहा पीत बसलो होतो…तेवढ्यात मावशीचा ओरडण्याचा आवाज आला “ पडली पडली “ बाहेर येऊन पाहतो तो काय, एक गाय खड्ड्यात पडली होती…वाड्यात शिरायच्या आधी एक अरुंद असा वाटेवरच खडडा आहे…त्यात एक गाय उलटी पडली होती…तिची मान खालच्या बाजूला आणि पाय वरती होते..गाईचा श्वास जोरात चालू होता..सुटकेसाठी हात पाय झाडत होती…गाईला बाहेर कसे काढायचे ते ठरवले…मावशीकडे नायलॉन चे रोप होते…असे ठरले की हे रोप गाईच्या पायाला बांधायचे..एक जण खड्ड्यात खाली उतरून खालच्या बाजूने गाईला वर ढकलेल आणि त्याच वेळेला आम्ही रोप ने गाईला वर उचलणार..पहिला प्रयत्न अयशस्वी झाला…कारण आम्ही जेवा गाईला वर खेचायचो तेव्हा ती हात पाय झाडायची आणि त्या ज़ोरामुळे ती परत खाली जायची…अखेर अर्ध्या पाउण तासानंतर गाय बाहेर आली..चांगलाच घाम काढला होता..आम्हाला वाटत होते की गाईची मान नक्की मोडली असणार..पण बाहेर आल्यावर ती ४,५ मिनिटे तशीच उभी राहिली..आणि नंतर टूणू टूणू चालत निघून सुद्धा गेली…फक्त थोडेफार ख़रचटले होते तिला…जिवावर बेतणार होते पण थोडक्यात निभावल होत.…गडी होते म्हणूनच गाईचा जीव वाचला नाहीतर आम्हा दोघा तीघाना तिला बाहेर काढणे अशक्य होते…जणू काही तिचा जीव वाचायचा होता म्हणूनच देवाने मजुराना गडावर थांबवून घेतले होते..
शनिवार रविवार अजुन कुमक आली…ज्या मोहीमेसाठी इतके दिवस प्लॅनिंग चालले होते त्याचा शेवट आज  झाला होता..मोहिम फत्ते झाली होती…जवळ जवळ ३००० घमेली माती काढली गेली होती…

निघायची वेळ आली आणि कसे कसेच व्हायला लागले…सुटीच्या दिवसात आपण आजोळी राहायला जातो..आजी आजोबा नातवाचे भरपूर लाड करतात…निघायच्या दिवशी दोघानाही वाईट वाटते..अगदी तसेच झाले होते…वाड्यातून पाय निघत नव्हता…मावशीला समोर पाहताच टचकन डोळ्यातून पाणी आले..अर्थात दोघांच्याही…८ दिवसांची आमची सोबत आज संपली होती…गड उतरताना एक एक दिवस आठवत होता..
गड उतरून खाली आलो…आठवड्याभरानतर आज पहिल्यांदी गाडीचा होर्न ऐकला होता…

मावशीच आणि माझ प्रत्यक्ष नात काहीच नाही पण मुलाप्रमाणे तिने माझयावर प्रेम केले..वाड्याच्या बाजूच्याच घरात ती राहते..रोज सकाळी मी उठायच्या वेळेला ती गरम गरम चहा घेऊन हजर असायची.. सकाळ, संध्याकाळी आंघोळीला गरम पाणी करून द्यायची..रात्री तिच्या हातची भाकरी, चटणी, कोशिंबीर खायला मिळायची…रात्री गरम दूध द्यायची..तिने खूप खूप केले…मी स्वताहाला नशिबवान समजतो..अहो, असे प्रेम मिळायलाही भाग्य लागते आणि ते मला लाभले…

या मोहीमेसाठी डोंबिवलीहून आलेली कुमक :- 1) प्रसाद निकते 2) स्वाती देसाई 3) सुजय राणे 4) संकेत गोरे 5) पराग दाबके 6) विशाल तळेकर 7) गणेश अभ्यंकर 8) पूजा दातार 9) मंदार होशिंग 10) प्रसन्न वैद्य 11) मनोज धारप..पालीहून मोहिमेचा आधार असणारे पुराणिक सर आणि बचू भूस्कुटे…या सर्वांचे खूप खूप आभार…

दर वर्षी ३१ डिसेंबर  ला या मोहिमेची आठवण येते..पुढेही येत राहील…आज उद्या पुरती नाही तर शेवट पर्यंत या आठवणींची सोबत राहणार आहे. विविध गड भ्रमंतीच्या भरपूर आठवणी आहेत.. कामा निमित्त सुधागडावर बर्‍याच वेळा जाणे झाले..  पण ही सुधागड मोहिम मनाच्या एका कोपर्‍यात सदैव घर करून राहील...सुधागडा, तुझे शतशा आभार…७ दिवस तुझया संगतीत राहायला दिलेस, बागडायला दिलेस, काळजी घेतलीस या बद्दल मी तुझा कायम ऋणी राहीन.. 

स्वप्नील केळकर.
८६८९८८८७०३





No comments:

Post a Comment