Monday, June 14, 2010

लोहगड - पहिलेवहिले दुर्गदर्शन

१३ वर्षांपूर्वीची गोष्ट. सन १९९७. महिना मार्च. नुकतीच ११ वि science ची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यामुळे मोकाट होतो. दिवस भराचा कार्यक्रम असा काहीच नसायचा. सूर्य डोक्यावर ( अगदी शब्दशः डोक्यावर हा..) येईपर्यंत तंगड्या पसरून झोपलेलो असायचो. उठल्यावर जेवायचं. दुपारी मित्रांकडे खेळायला. संध्याकाळी क्रिकेट. नाक्यावर मित्र भेटायचे. रात्री पत्ते. बस्स, दिवस संपला. पुन्हा तंगड्या पसरायला मोकळे ते थेट दुसऱ्या दिवशीचा सूर्य 'डोक्यावर' येईपर्यंत.

असाच एका संध्याकाळी नाक्यावर गेलो होतो. मला जायला थोडा उशीरच झालेला. नेहमीप्रमाणे कटिंग मारला. कसला तरी बेत आखला जात होता. कान टवकारले तेव्हा कळलं कि कुठेतरी ट्रेकला जायचा बेत आहे.

१० वीला असताना आम्ही क्लासला जायचो तिकडे प्रमोद जोशी नावाचे सर आम्हाला अर्थशास्त्र शिकवायचे. ते स्वतः उत्तम आणि अनुभवी ट्रेकर आहेत. ते सुद्धा ट्रेकला बरोबर जाणार होते.
मित्रांनी विचारले, 'तू येणार का?' ह्या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. एकतर मी ह्यापूर्वी कधीही ट्रेकला गेलो नव्हतो. आपल्याला जमेल कि नाही, झेपेल कि नाही असे अनेक प्रश्न. आणि त्याहून सर्वात मोठ्ठा प्रश्न म्हणजे घरचे सोडतील कि नाही. कारण आमच्या घरात ' ट्रेक' ला वगैरे जाण्याचा उद्योग ह्या आधी कुणीही केला नव्हता.

रात्री घरी आल्यावर जेवताना सहज विषय काढला. मी विचारलं कि मित्र ट्रेकला जाणार आहेत , मी जाऊ का? उत्तर अपेक्षित होत तेच मिळालं. डोंगरावर, दगड धोंड्यांमध्ये जायची काही एक गरज नाहीये. उगाच धडपडून येशील.
मनातल्या मनात उगाच थोडासा नाराज झालो होतो. ट्रेकिंग बद्दल काहीच माहित नव्हतं पण उगाच उत्सुकता लागून राहिली होती, काहीतरी नवीन करणार होतो ना :-)
तिकडे ट्रेकची तयारी जोरात सुरु झाली होती. चहा पावडर, साखर, तांदूळ अशी यादी होत होती. कोणी काय सामान आणायचं ह्याच गणित आखलं जात होतं. लगबग सुरु होती. ट्रेकच ठिकाण ठरलं होत "लोहगड". आणि दिवस होता रंगपंचमीचा. म्हणजेच ह्यावर्षीची रंगपंचमी ट्रेक मध्ये साजरी होणार होती आणि त्यात आपण नसल्यामुळे जास्तच हुरहूर वाटत होती.
सरांना सांगितलं कि मी येत नाहीये. घरचे सोडत नाहीयेत. सर म्हणाले कि काळजी करू नकोस मी येतो घरी भेटायला;म्हटलं सर खरंच याल? माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
आणि सर खरंच घरी आले. सरांनी बरंच समजावून सांगितलं, बऱ्याच विचार विनिमया अंती 'permission granted'. परवानगी मिळाली. इतका आनंद झाला होता म्हणून सांगू. इतिहास, किल्ले हे फक्त शालेय पुस्तकांमध्येच वाचलं होतं पण आता किल्ल्यावर प्रत्यक्ष जायचं होतं. तटबंदी, दरवाजे, भव्य बुरुज, उंच कडे, खोल खोल दऱ्या आता प्रत्यक्ष पाहणार होतो.
जायचा दिवस आला. सर्व तयारी झाली होती. sack पाठीवर लटकवून सर्व गडी सज्ज होते.
डोम्बिवलीहून कल्याण मग passenger ने लोणावळा. तिथून पुन्हा रेल्वेने मळवली. पहाटे पहाटेच मळवलीला पोहोचलो होतो. सकाळची मस्त थंडी पडलेली.समोर गड दिसत होता. आयुष्यात पहिल्यांदा गड पाहत होतो. अख्खा गड एका नजरेत मावत नव्हता. सरांनी सांगितले कि उजवीकडे दिसते ती गडाची माची, विंचूकाटा आणि डावीकडे नेढं. माची, नेढं हे सर्वकाही नवीन होतं. या शब्दांचे अर्थ नंतर समजावून घेतले.
उत्साह प्रचंड असल्यामुळे चालत कधी लोहगडवाडी पर्यंत पोचलो समजलंच नाही. गावात धूलीवंदनाची गडबड कुठेच दिसत नव्हती. सरांनी सांगितलं कि गावांमध्ये होळी पौर्णिमेनंतर ५ व्या दिवशी म्हणजेच पंचमीला रंग खेळतात. हीच खरी प्रथा आहे. एक नवीन माहिती ऐकायला मिळाली होती.
गावात नाश्ता करून चढाईला सुरुवात केली. फारशी चढाई नसल्यामुळे थोड्या पायऱ्याचढून गेल्यावर पहिल्या दरवाज्यात येतो. अबब, काय तो प्रचंड दरवाजा !!! केवढे भव्य ते चिरेबंदी बांधकाम. सर सांगत होते याला जंग्या म्हणतात, याला अडण्या. पूर्वी गडाचे दरवाजे सूर्योदयाला उघडत आणि सूर्यास्ताला बंद होत. आत प्रवेशल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या. केवढा तो चिरेबंदी दरवाजा, कोरलेली शिल्पे. सगळंच अजब. एकामागोमाग असे दरवाजे पार केल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. वरून पाहिल्यावर सर्व दरवाज्यांची साखळी अतिशय सुंदर दिसते. वाटतं, शत्रूची काय बिशाद हल्ला करण्याची.
आम्ही मुक्कामाच्या गुहेत पोचलो. केवढी मोठी हो गुहा ती. पाठीवरून sack टाकल्या. satar फटर खान बाहेर यायला लागल. खान झाल्यावर मस्त चहा केला आणि गड दर्शनाला निघालो. गुहेबाहेर दोन तोफा होत्या, त्या पहिल्या. पाण्याची टाकी बघितली. संध्याकाळी सूर्यास्ताला माचीवर उर्फ विंचू काट्यावर जायचे ठरले. परत गुहेत येऊन दुपारचे जेवण केले. दुपारचे थोडे आडवे पडलो. त्यावेळचा एक किस्सा सांगतो.
मुख्य गुहेतून आत दुसऱ्या गुहेत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायर्यांच्याच बाजूला ओटे आहेत. त्यातल्या एका ओट्यावर दोघे जण झोपले होते. दोघेही अंगाने मजबूत, उभे आडवे आणि लांबरुंद. सगळं काही शांत असताना एकदम आवाज झाला. दचकून सगळे जागे झालो. पाहतो तर काय, ओट्यावर झोपलेल्या दोघांपैकी एक जण खाली पडला होता. थोडे घाबरलो होतो आणि एकीकडे हसू सुद्धा येत होतं. आम्ही त्याला चिडवीत होतो कि एवढा मोठा झाला तरी झोपेत कसा पडतो..तोवर दुसरा जागा झाला होता. त्याला विचारले काय झाले रे ? हा कसा पडला ? त्याच उत्तर मोठं मार्मिक होत. तो म्हणाला " मी काहीच नाही केलं, मी फक्त कूस बदलली " आणि सगळीकडे हशा पिकला.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सूर्यास्ताला विंचू काट्यावर गेलो. खरं सांगतो मित्रांनो, कधीच विसरू शकणार नाही तो क्षण. डोंगराच्या एका टोकावर आपण बसलो आहोत. समोर अखंड दरी, खाली निपचित पडलेली गावं, सोनेरी दिसणारं नदीचं नागमोडी पात्र आणि समोर अस्ताला चाललेले सुर्यनारायण. केशरी रंगांच्या छटांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकलं होतं. क्षणाक्षणाला सूर्यबिंब खाली खाली जात होतं. प्रकाश कमी होत होता आणि अंधार त्याची जागा घेत होता. हे सगळं अदभूत डोळ्यात साठवून आम्ही गुहेत परतलो. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. बेत होता खिचडीचा. तांदूळ धुणं, कांदे बटाट्याच्या फोडी करणं अशी कामं चाललेली होती. नकळतच यातून सांघिक भावना निर्माण होत होती. खिचडी अगदी झक्कास झालेली..गुहेत केलेले ते 'candle light dinner ' अजूनही आठवतंय :-)
सकाळी चहा झाल्यावर सगळे तयार झाले ते रंग खेळायला. भरपूर रंग खेळलो. जाम धमाल केली. अजून कोणी नव्हतं, होतो फक्त आम्हीच आणि तेही आमच्यासारखे आम्हीच..
खेळल्यावर मस्त आंघोळी झाल्या. बादल्या आणि बाटल्या भरून घेतल्या होत्या जेणे करून गडावरची टाकी खराब होणार नाहीत..
दुपारचे जेवण करून थोडा आराम केला. आता गड सोडायची वेळ झाली होती. दोन दिवस अगदी मस्त गेले होते. का कोणास ठाऊक पण गडावर राहताना, फिरताना परकं असं कधी वाटलंच नाही. आपल्या मोठ्या भावाच्या घरी दोन दिवस राहून आल्यासारखं वाटलं.