Friday, November 5, 2010

अष्टप्रधान, बारा महाल, अठरा कारखाने,पायदळ, घोडदळ

" प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री
सेनापती त्यात असे सुजाणा अष्टप्रधानी शिव मुख्य राणा "

' अष्टप्रधान ' हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. परंतु हे अष्टप्रधान कोण होते, त्यांचे अधिकार काय होते याची माहिती आपण येथे करून घेणार आहोत.
राज्यकारभारामध्ये सुसूत्रता यावी यासाठी विविध दर्जाचे, अधिकाराचे लोक महाराजांनी नेमले होते. ते कोण हे आता पाहूया.

१) मुख्यप्रधान अर्थात पेशवे :-
राजानंतर अधिकाराने सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे पेशवे. राजाच्या गैरहजेरीत सर्व कारभार प्रधान सांभाळीत असत.राज्याची एकंदर व्यवस्था सुरळीत आहे कि नाही हे पाहणे तसेच वेळ आल्यास युद्धात नेतृत्व करणे, सैन्य घेऊन नवीन प्रदेश जिंकणे अशी विविध कामे प्रधानांकडे असत.खलीत्यांवर, पत्रांवर राजाच्या शिक्क्यानंतर पेशव्यांचे शिक्कामोर्तब होई. मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे होते.
२) अमात्य :- आजच्या भाषेत अमात्य म्हणजे अर्थमंत्री किंवा finance minister. राज्यातील एकंदर जमाखर्चांवर अमात्यांचे नियंत्रण असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते.
३) सेनापती उर्फ सरनौबत :- संपूर्ण लष्करावर सेनापतीचे नियंत्रण असे. लष्कराचा कारभार, सैनिकांचे वेतन, युद्धात जे पराक्रम गाजवतील त्यांचा छत्रपतींच्या हस्ते सत्कार, युद्ध प्रसंगी नेतृत्व इ. कामे सेनापतींच्या अधिकारात असत. लष्कराचे घोडदळ आणि पायदळ असे दोन मुख्य प्रकार होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. यांचे मूळ नाव 'हंसाजी मोहिते'. ' हंबीरराव' हि महाराजांनी त्यांस दिलेली पदवी आहे.

४) सचिव :- सचिव म्हणजे सेक्रेटरी. सरकारी दफ्तरावर सचिवाची देखरेख असे.सर्व पत्रव्यवहार सचिवाच्या खात्याकडून होत असे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते.
५) मंत्री :- राजाचे आमंत्रित पाहुणे तसेच भेटीस येणारे लोक यांचे स्वागत करणे, बारा महाल, अठरा कारखाने यांचा बंदोबस्त ठेवणे, राजांच्या दिनचर्येची नोंद ठेवणे इ. मंत्र्याची कामे असत.राजाची राजकीय बाजू सांभाळणे तसेच खासगी सल्लागार म्हणून मंत्र्याची नियुक्ती असे.दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते.
६) सुमंत किंवा डबीर :- सुमंत म्हणजेच सोप्या भाषेत परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा external affairs minister.परराष्ट्र संबंधित सर्व व्यवहार सुमंत पाहत असत. परराष्ट्र राजकारण पाहणे,अन्य राज्यांमधून येणाऱ्या वकिलांची बडदास्त ठेवणे,परराष्ट्राशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे ही मुख्यतः सुमान्ताची कामे होत.रामचंद्र त्रिंबक हे सुमंत होते.
७) न्यायाधीश :- न्यायाधीश या शब्दातूनच याचे अधिकार स्पष्ट होतात. निराजी रावजी हे न्यायाधीश होते.
८) पंडितराव :- धार्मिक बाजू सांभाळण्याचे काम पंडितराव किंवा न्यायशास्त्री कडे असे.मोरेश्वर हे न्यायशास्त्री होते.

या अष्टप्रधानांची per annum salary किंवा वार्षिक वेतन पुढीलप्रमाणे :-
मुख्य प्रधान, अमात्य, सचिव :- प्रत्येकी १५००० होन.
मंत्री, सुमंत, न्यायाधीश, सेनापती, पंडितराव :- प्रत्येकी १०००० होन.
एक होन = साडे तीन रुपये.

इतर अधिकारी :- अष्टप्रधानांना एक एक अधिकारी दिलेला असे.अष्टप्रधानांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार हे अधिकारी पाहीत.या अधिकाऱ्यांना 'मुतालिक' म्हणत.या मुतालीकांच्या हाताखाली असलेल्या व्यक्ती किंवा 'कामदार' पुढीलप्रमाणे :-
१) कारखाननिस :- दाण्यागोट्याची व्यवस्था.
२) जामदार :- एकंदर चीझवस्तू, नगद यांचा संग्रह.
३) पोतनीस :- रोकड सांभाळणे.
४) सबनीस :- दफ्तर सांभाळणे.
५) मुजुमदार :- जमाखर्च पाहणे.
६) फडणवीस :- मुजुमदाराचा दुय्यम अधिकारी.
७) चिटणीस :- पत्रव्यवहार.
८) पाटील :- गावाचा मुख्य अधिकारी. यांस 'मोकदम' असेही म्हणत.
९) कुलकर्णी :- ग्रामलेखक, गावचा लेखापाल. पाटलाचा सह अधिकारी.
१०) देशमुख :- अनेक खेड्यांचा मिळून 'परगणा' होत असे. या पर्गण्यांमधील सर्व पाटलांचा मुख्य तो 'देशमुख'.
११) देशपांडे :- या पर्गण्यांमधील सर्व कुलकर्ण्यांचा मुख्य तो 'देशपांडे'.

वरील शब्दांची आडनावे आज आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. हि आडनावे या अधिकारांवरून आलेली आहेत किंवा या अधिकारांवरूनच हि आडनावे रूढ झालेली असावीत.

अठरा कारखाने (अष्टादश शाळा) :-
१) तोफखाना, २) पिल्खाना (हत्तीशाळा), ३) दफ्तरखाना, ४) उष्टर्खाना (उंटशाळा), ५) फरासखाना (राहुट्या,तंबू), ६) शिकारखाना, ७) तालीमखाना (मल्लशाळा), ८) अंबरखाना (धान्यकोठार), ९) नगारखाना, १०) शरबतखाना (वैद्यशाला), ११) अब्दारखाना (पेयशाला), १२) जवाहीरखाना, १३) मुदपाकखाना (स्वयंपाक), १४) जीरातेखाना (शस्त्रशाळा), १५) खजिना, १६) जामदारखाना (धनालय), १७) दारूखाना (दारुगोळा), १८) नाटकशाळा.

बारामहाल (द्वादशकोश) :-
१) छबिनामहाल (रात्ररक्षक), २) पोतेमहाल (कोषागार), ३) सौदागीरमहाल (व्यापारी महाल), ४) टंकसाळमहाल (नाणी), ५) इमारतमहाल (बांधकाम), ६) पालखीमहाल, ७) गोशाळा, ८) सेरीमहाल (तृप्तीघर), ९) कोठीशाळा, १०) वहिली महाल (रथशाळा), ११) दरुनीमहाल (अन्तःपूर), १२) वसनागार

पायदळाची रचना :-
१) नाईक :- ९ शिपायांचा प्रमुख,
२) हवालदार :- ५ 'नाईकांचा' प्रमुख,
३) जुमलेदार :- ५ 'हवालदारांचा' प्रमुख.
४) हजारी :- १० 'जुमलेदारांचा' प्रमुख.
५) पाच हजारी :- ५ 'हजारींचा' प्रमुख.
६) सेनापती किंवा सरनौबत :- 'पाच हजारींचा' प्रमुख.

घोडदळाची रचना :-
मुख्य २ प्रकार :-
१) बारगीर :- बारगीराकडील घोडे सरकारी असत.यांस 'पागा' असेही संबोधिले जायचे.
२) शिलेदार :- शिलेदाराकडील घोडे त्याचे स्वतःचे असत.
उपप्रकार :-
१) हवालदार :- २५ बारगीर किंवा शिलेदारांचा प्रमुख.
२) जुमलेदार :- ५ 'हवालदारांचा' प्रमुख.
३) सुभेदार :- ५ 'जुमलेदारांचा' प्रमुख.
४) पाच हजारी :- १० 'सुभेदारांचा' प्रमुख.

मित्रांनो,
ऐतिहासिक कथा, कादंबरी वाचताना प्रस्तुत लेखात दिलेल्या शब्दांचे, अधिकारांचे उल्लेख आपल्या वाचनात सर्रास आले असतील. आता या शब्दांचे नक्की अर्थ सुद्धा समजल्यामुळे वाचताना काय गोडी येईल ते पहा !!!

Wednesday, August 11, 2010

किल्ले

आपण किल्ल्यांवर जातो पण मुळात हे किल्ले काबांधले असतील, त्यांचे प्रकार किती, त्यांवर आढळणाऱ्या वास्तू कोणत्या इ. ची माहिती आपण इथे घेणार आहोत.

किल्ल्यांची उपयुक्तता, गरज :-
- आता शहरांमध्ये जशी 'पोलीस चौकी' असते, त्याप्रमाणे पूर्वी किल्ल्यांचा वापर चौकी म्हणून होत असे.
- जमीन सपाटीपेक्षा उंचावर असल्याने संरक्षण तसेच सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवणे सुलभ होते.
- मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी त्याजवळ किल्ला बांधला जात असे.
- खजिना, रसद सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच शत्रूची फौज जवळ आल्यास महत्वाच्या व्यक्तींकरिता आश्रयस्थान म्हणून किल्ल्याचा उपयोग होत असे.
- परराज्यावर आक्रमण करायचे असेल तर सरहद्दी जवळचे आपल्या ताब्यातील किल्ले स्वतःच्या फौजेकरिता दारू गोळ्याची आणि रसदेची सुरक्षित कोठारे म्हणून उपयोगी पडत असत तसेच युद्ध प्रसंगी माघार घेण्याचा प्रसंग आल्यास आश्रय स्थान म्हणूनही उपयोगी पडत.
- एखाद्या डोंगरी किल्ल्याजवळील दुसऱ्या एखाद्या डोंगरावर तोफा चढविता येऊ नये म्हणून तो डोंगर सुद्धा तटबंदी बांधून संरक्षित केला जाई. उ.दा. पुरंदर-वज्रगड.

किल्ल्यांचे साधारण प्रकार :-
१) डोंगरी किल्ले किंवा गिरी दुर्ग :- उंच डोंगरांवर जे किल्ले बांधले जात ते 'गिरी दुर्ग'. उ.दा. रायगड, प्रतापगड.
२) जलदुर्ग :- चाहु बाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावर बांधलेला दुर्ग म्हणजे जलदुर्ग. समुद्रीमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी जलदुर्गांचा वापर होत असे. उ.दा. सिंधुदुर्ग.
३) भुईकोट :- 'भुई' म्हणजे जमीन. जमिनीवर बांधलेला कोट म्हणजे भुईकोट. उ.दा. चाकण.

किल्ल्यावर सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या वास्तू :-
१) दरवाजा :- ज्याप्रमाणे घरात प्रवेश करण्यासाठी दरवाज्याचा वापर होतो, त्याप्रमाणे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दरवाज्याचा वापर होत असे. दरवाज्यांच्या बांधणीच्या प्रकारांवरून किल्ला कोणत्या काळात बांधला गेला असेल हे सांगता येते. उ.दा. गोमुखी दरवाजा बांधणी ही शिव शाहीच्या काळात वापरली गेली.
किल्ल्यास एका पेक्षा जास्त दरवाजे असत. 'महादरवाजा' म्हणजे मुख्य वापरातला दरवाजा तसेच 'गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा किंवा चोर दिंडी' म्हणजे संकट काळी निसटून जाण्यासाठी वापरला जाणारा दरवाजा अशी विशेषणे वापरली जात.
२) तटबंदी :- आपण राहतो त्या इमारतीला जशी बाहेरून भिंत असते त्याप्रमाणेच 'संरक्षक भिंत' म्हणून तटबंदी बांधली जायची.लढाई च्या काळात खालून येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी तसेच एरवी नित्य नेहमीच्या पहाऱ्या साठी तटबंदीचा वापर होत असे.
काही भुई कोट किल्ल्यांना दुहेरी तट असे. त्यापैकी बाहेरचा तट हा आतील तटापेक्षा उंचीने जरा कमी असे. त्यामुळे बाहेरील तट जरी शत्रूच्या ताब्यात गेला तरी आतील तटावरून बाहेरील तटावर मारा करणे सुलभ व्हावे हा हेतू. या बाहेरच्या तटाला 'शेर हाजी' म्हणत.
३) जंग्या :- किल्ल्यातील सैनिकांना तटावरून गोळीबार करताना आडोसा मिळावा म्हणून तटास फटी ठेवीत त्यास 'जंग्या' म्हणतात. खालून येणाऱ्या शत्रूला किल्ल्यावरून गोळीबार करणारे सैनिक नक्की किती आणि कुठे आहेत हे या मुळे समजत नसे.
४) बुरुज :- सामान्यतः दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंना तसेच तटबंदी मध्ये ठराविक अंतरांवर बुरुज बांधले जात.
तटबंदी चढून एखादा शत्रू वर येत असेल तर तटबंदीच्या पायथ्यापासून काही अंतरापर्यंतची जागा ही जन्ग्यांच्या माराच्या टप्प्यात येत नाही. यासाठी बुरुजाचा उपयोग होत असे. तसेच तोफांनी सज्ज असे बुरुज आजही आपल्याला पाहायला मिळतात.
५) मंदिर :- आपल्या घरात जसे देवघर असते तसे किल्ल्यावरसुद्धा मंदिर बांधले जायचे. गडदेवता, गणपती, मारुती अशी अनेक मंदिरे आजही आपल्याला पाहायला मिळतात.
मारुती मंदिर :- 'प्रतापमारुती', 'दासमारुती' अशा रूपातील मारुतीराया आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात. योद्ध्याच्या रुपात असते तो प्रतापमारुती तर हात जोडून असतो तो दासमारुती. दक्षिणाभिमुख असा प्रताप मारुती आपल्याला बऱ्याचदा गडावर पाहायला मिळतो. दक्षिण दिशा हि यमाची, वाईट प्रवृत्तींची,शक्तींची मानली जाते.त्या पासून संरक्षण म्हणून मारुती दक्षिणाभिमुख असतो. आजही आपल्या घरी दक्षिण दिशेकडील भिंतीवर मारुतीची फ्रेम असते.
६) पाण्याची टाकी :- गडावर पाणीपुरवठ्याच्या सोयी साठी टाकी बांधली जात.
७) माची :- जिथून गडावर चढून येणे सोपे असेल असे एखादे पठार किंवा सोंड किल्ल्याच्याच डोंगरावर पण किल्ल्याच्या जरा खालच्या पातळीवर असेल तर त्यालाही तटबंदी बंधित असत.यालाच माची म्हणतात. उ.दा. राजगडावरील संजीवनी माची.
८) बालेकिल्ला :- गडाच्या मुख्य पठारावर एखादे टेकाड असेल तर त्याला तत्बंडीने सज्ज करीत असत. याच बालेकिल्ला म्हणतात.गडावरील प्रमुख व्यक्तींची निवासाची सोय बालेकिल्ल्यावर केली जायची.
'बाला-इ-किल्ला' या फारसी संज्ञेचे हे अपभ्रष्ट रूप आहे. बाला म्हणजे वर,वरचा किंवा डोंगर माथ्याचा हा फारसी शब्द आहे आणि कलआ म्हणजे किल्ला हा अरबी शब्द आहे. बाला-इ-कलआ म्हणजे किल्ल्याचा वरचा भाग.
९) शिलालेख :- शिला म्हणजे दगड. दगडावर लिहिलेला लेख म्हणजेच शिलालेख.मराठी,संस्कृत,पोर्तुगीज भाषेतले शिलालेख आज कित्येक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.
१०) तोफा :- तोफ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल तर धातूची लांब पोकळ नळी. तोफेच्या वरील मागच्या बाजूला एक छिद्र असते यातून वात आत सोडायचे. तोफेत प्रथम दारू आणि नंतर तोफगोळा टाकायचे.वात पेटवल्यावर आतली दारू पेट घेऊन उर्जा निर्माण होते. या उर्जेत प्रचंड शक्ती असते. हि उर्जा बाहेर पडायचा प्रयत्न करते.बाहेर जाण्याच्या वाटेवर तोफगोळा असल्याने गोळा बाहेर फेकला जातो.अशा रीतीने तोफगोळा लांबवर फेकला जातो. तोफगोळ्याने पार करायचे अंतर हे तोफेचे जमिनीशी असलेल्या अंशाशी निगडीत असते.

'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या मध्येच दुर्गाचे महत्व अधोरेखित होते. आता हे किल्ले पडक्या अवस्थेत असले तरी इतिहासकाळात त्यांनी बजावलेली कामगिरी हि अतुलनियच आहे. शत्रूच्या माऱ्यापुढे तग धरून ताठ मानेने हे किल्ले इतिहास काळात उभे राहिले,झुंजत राहिले आणि आताही झुंजतच आहेत...कशाशी तर वाऱ्या-पावसाशी.
कित्येक तोफगोळ्यांचे, तलवारींचे मार त्यांनी सहन केले असतील, बंदुकीच्या गोळ्या त्यांनी छाताडावर झेलल्या असतील. आणि....आणि आताही वार झेलतच आहेत...कोणाचे ? अजून कोणी नाही तर स्वकीयांचेच.. दगडांवर आपली नावे कोरणे म्हणजे एक प्रकारे या किल्ल्यांना पोचवलेली जखमच नव्हे का ?

मित्रहो, जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते कि आजी आजोबांच्या अंगाखांद्यांवर जशी नातवंडे बागडतात,खेळतात तसेच आपणही या किल्ल्यांवर मनसोक्त बागडूया..बघा, हे किल्ले, हा निसर्ग आपल्यावर किती भरभरून प्रेम करतील, नातेच असे विलक्षण आहे हे !!!

Monday, June 14, 2010

लोहगड - पहिलेवहिले दुर्गदर्शन

१३ वर्षांपूर्वीची गोष्ट. सन १९९७. महिना मार्च. नुकतीच ११ वि science ची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यामुळे मोकाट होतो. दिवस भराचा कार्यक्रम असा काहीच नसायचा. सूर्य डोक्यावर ( अगदी शब्दशः डोक्यावर हा..) येईपर्यंत तंगड्या पसरून झोपलेलो असायचो. उठल्यावर जेवायचं. दुपारी मित्रांकडे खेळायला. संध्याकाळी क्रिकेट. नाक्यावर मित्र भेटायचे. रात्री पत्ते. बस्स, दिवस संपला. पुन्हा तंगड्या पसरायला मोकळे ते थेट दुसऱ्या दिवशीचा सूर्य 'डोक्यावर' येईपर्यंत.

असाच एका संध्याकाळी नाक्यावर गेलो होतो. मला जायला थोडा उशीरच झालेला. नेहमीप्रमाणे कटिंग मारला. कसला तरी बेत आखला जात होता. कान टवकारले तेव्हा कळलं कि कुठेतरी ट्रेकला जायचा बेत आहे.

१० वीला असताना आम्ही क्लासला जायचो तिकडे प्रमोद जोशी नावाचे सर आम्हाला अर्थशास्त्र शिकवायचे. ते स्वतः उत्तम आणि अनुभवी ट्रेकर आहेत. ते सुद्धा ट्रेकला बरोबर जाणार होते.
मित्रांनी विचारले, 'तू येणार का?' ह्या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. एकतर मी ह्यापूर्वी कधीही ट्रेकला गेलो नव्हतो. आपल्याला जमेल कि नाही, झेपेल कि नाही असे अनेक प्रश्न. आणि त्याहून सर्वात मोठ्ठा प्रश्न म्हणजे घरचे सोडतील कि नाही. कारण आमच्या घरात ' ट्रेक' ला वगैरे जाण्याचा उद्योग ह्या आधी कुणीही केला नव्हता.

रात्री घरी आल्यावर जेवताना सहज विषय काढला. मी विचारलं कि मित्र ट्रेकला जाणार आहेत , मी जाऊ का? उत्तर अपेक्षित होत तेच मिळालं. डोंगरावर, दगड धोंड्यांमध्ये जायची काही एक गरज नाहीये. उगाच धडपडून येशील.
मनातल्या मनात उगाच थोडासा नाराज झालो होतो. ट्रेकिंग बद्दल काहीच माहित नव्हतं पण उगाच उत्सुकता लागून राहिली होती, काहीतरी नवीन करणार होतो ना :-)
तिकडे ट्रेकची तयारी जोरात सुरु झाली होती. चहा पावडर, साखर, तांदूळ अशी यादी होत होती. कोणी काय सामान आणायचं ह्याच गणित आखलं जात होतं. लगबग सुरु होती. ट्रेकच ठिकाण ठरलं होत "लोहगड". आणि दिवस होता रंगपंचमीचा. म्हणजेच ह्यावर्षीची रंगपंचमी ट्रेक मध्ये साजरी होणार होती आणि त्यात आपण नसल्यामुळे जास्तच हुरहूर वाटत होती.
सरांना सांगितलं कि मी येत नाहीये. घरचे सोडत नाहीयेत. सर म्हणाले कि काळजी करू नकोस मी येतो घरी भेटायला;म्हटलं सर खरंच याल? माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
आणि सर खरंच घरी आले. सरांनी बरंच समजावून सांगितलं, बऱ्याच विचार विनिमया अंती 'permission granted'. परवानगी मिळाली. इतका आनंद झाला होता म्हणून सांगू. इतिहास, किल्ले हे फक्त शालेय पुस्तकांमध्येच वाचलं होतं पण आता किल्ल्यावर प्रत्यक्ष जायचं होतं. तटबंदी, दरवाजे, भव्य बुरुज, उंच कडे, खोल खोल दऱ्या आता प्रत्यक्ष पाहणार होतो.
जायचा दिवस आला. सर्व तयारी झाली होती. sack पाठीवर लटकवून सर्व गडी सज्ज होते.
डोम्बिवलीहून कल्याण मग passenger ने लोणावळा. तिथून पुन्हा रेल्वेने मळवली. पहाटे पहाटेच मळवलीला पोहोचलो होतो. सकाळची मस्त थंडी पडलेली.समोर गड दिसत होता. आयुष्यात पहिल्यांदा गड पाहत होतो. अख्खा गड एका नजरेत मावत नव्हता. सरांनी सांगितले कि उजवीकडे दिसते ती गडाची माची, विंचूकाटा आणि डावीकडे नेढं. माची, नेढं हे सर्वकाही नवीन होतं. या शब्दांचे अर्थ नंतर समजावून घेतले.
उत्साह प्रचंड असल्यामुळे चालत कधी लोहगडवाडी पर्यंत पोचलो समजलंच नाही. गावात धूलीवंदनाची गडबड कुठेच दिसत नव्हती. सरांनी सांगितलं कि गावांमध्ये होळी पौर्णिमेनंतर ५ व्या दिवशी म्हणजेच पंचमीला रंग खेळतात. हीच खरी प्रथा आहे. एक नवीन माहिती ऐकायला मिळाली होती.
गावात नाश्ता करून चढाईला सुरुवात केली. फारशी चढाई नसल्यामुळे थोड्या पायऱ्याचढून गेल्यावर पहिल्या दरवाज्यात येतो. अबब, काय तो प्रचंड दरवाजा !!! केवढे भव्य ते चिरेबंदी बांधकाम. सर सांगत होते याला जंग्या म्हणतात, याला अडण्या. पूर्वी गडाचे दरवाजे सूर्योदयाला उघडत आणि सूर्यास्ताला बंद होत. आत प्रवेशल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या. केवढा तो चिरेबंदी दरवाजा, कोरलेली शिल्पे. सगळंच अजब. एकामागोमाग असे दरवाजे पार केल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. वरून पाहिल्यावर सर्व दरवाज्यांची साखळी अतिशय सुंदर दिसते. वाटतं, शत्रूची काय बिशाद हल्ला करण्याची.
आम्ही मुक्कामाच्या गुहेत पोचलो. केवढी मोठी हो गुहा ती. पाठीवरून sack टाकल्या. satar फटर खान बाहेर यायला लागल. खान झाल्यावर मस्त चहा केला आणि गड दर्शनाला निघालो. गुहेबाहेर दोन तोफा होत्या, त्या पहिल्या. पाण्याची टाकी बघितली. संध्याकाळी सूर्यास्ताला माचीवर उर्फ विंचू काट्यावर जायचे ठरले. परत गुहेत येऊन दुपारचे जेवण केले. दुपारचे थोडे आडवे पडलो. त्यावेळचा एक किस्सा सांगतो.
मुख्य गुहेतून आत दुसऱ्या गुहेत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायर्यांच्याच बाजूला ओटे आहेत. त्यातल्या एका ओट्यावर दोघे जण झोपले होते. दोघेही अंगाने मजबूत, उभे आडवे आणि लांबरुंद. सगळं काही शांत असताना एकदम आवाज झाला. दचकून सगळे जागे झालो. पाहतो तर काय, ओट्यावर झोपलेल्या दोघांपैकी एक जण खाली पडला होता. थोडे घाबरलो होतो आणि एकीकडे हसू सुद्धा येत होतं. आम्ही त्याला चिडवीत होतो कि एवढा मोठा झाला तरी झोपेत कसा पडतो..तोवर दुसरा जागा झाला होता. त्याला विचारले काय झाले रे ? हा कसा पडला ? त्याच उत्तर मोठं मार्मिक होत. तो म्हणाला " मी काहीच नाही केलं, मी फक्त कूस बदलली " आणि सगळीकडे हशा पिकला.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सूर्यास्ताला विंचू काट्यावर गेलो. खरं सांगतो मित्रांनो, कधीच विसरू शकणार नाही तो क्षण. डोंगराच्या एका टोकावर आपण बसलो आहोत. समोर अखंड दरी, खाली निपचित पडलेली गावं, सोनेरी दिसणारं नदीचं नागमोडी पात्र आणि समोर अस्ताला चाललेले सुर्यनारायण. केशरी रंगांच्या छटांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकलं होतं. क्षणाक्षणाला सूर्यबिंब खाली खाली जात होतं. प्रकाश कमी होत होता आणि अंधार त्याची जागा घेत होता. हे सगळं अदभूत डोळ्यात साठवून आम्ही गुहेत परतलो. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. बेत होता खिचडीचा. तांदूळ धुणं, कांदे बटाट्याच्या फोडी करणं अशी कामं चाललेली होती. नकळतच यातून सांघिक भावना निर्माण होत होती. खिचडी अगदी झक्कास झालेली..गुहेत केलेले ते 'candle light dinner ' अजूनही आठवतंय :-)
सकाळी चहा झाल्यावर सगळे तयार झाले ते रंग खेळायला. भरपूर रंग खेळलो. जाम धमाल केली. अजून कोणी नव्हतं, होतो फक्त आम्हीच आणि तेही आमच्यासारखे आम्हीच..
खेळल्यावर मस्त आंघोळी झाल्या. बादल्या आणि बाटल्या भरून घेतल्या होत्या जेणे करून गडावरची टाकी खराब होणार नाहीत..
दुपारचे जेवण करून थोडा आराम केला. आता गड सोडायची वेळ झाली होती. दोन दिवस अगदी मस्त गेले होते. का कोणास ठाऊक पण गडावर राहताना, फिरताना परकं असं कधी वाटलंच नाही. आपल्या मोठ्या भावाच्या घरी दोन दिवस राहून आल्यासारखं वाटलं.

Tuesday, April 20, 2010

मनातलं काहीसं......

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री जिजाबाई, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे असंख्य शिलेदार , किल्लेदार, शिपाई, अनेक ज्ञात अज्ञात वीरांना तसेच ज्यांचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य या स्वराज्य निर्माणात आहे असे अनेक दुर्ग' या सर्वाना प्रथम सादर प्रणाम !!!

दुर्ग भ्रमंतीला 'यात्रा' असे संबोधन का ?
चारधाम, अष्टविनायक, वैष्णोदेवी ई. धार्मिक ठिकाणे आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. तिकडे आपण जाऊन आलो तर यात्रेला जाऊन आलो असे म्हणतो. उ.दा. चारधाम यात्रेला जाऊन आलो. तोंडून पटकन चारधाम सहलीला जाऊन आलो असे येत नाही किंवा माथेरान यात्रा केली असेही म्हणत नाही. हे असे का ? याचे कारण मला असे वाटते कि या ठिकाणांना एक विशिष्ट महत्व, पाया आहे.मग तो धार्मिक असेल किंवा आध्यात्मिक असेल. आणि म्हणूनच हि आपल्यासाठी तीर्थक्षेत्रे होतात.
तीर्थक्षेत्रांना जसा धर्माचा पाया तसाच या दुर्गाना इतिहासाचा. या दुर्गांचे स्थान, महात्म्य ऐतिहासिक दृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या खूप आहे.इथल्या भूगोलाचा अभ्यास आणि उपयोग करून इतिहास घडविला गेला आहे. 'थोरले स्वामींनी हे राज्य गडावरूनच निर्माण केले' यातच सर्व काही आले.मग दुर्गप्रेमींसाठी हि तीर्थक्षेत्रेच नाहीत का ?
जसे धार्मिक ठिकाणी गेल्यावर त्या स्थानाचे पावित्र्य आपण राखतो तसेच जेवा दुर्गांवर जाऊ तेव्हा सुद्धा राखलेच पाहिजे नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.

ही कसली मानसिकता ?
इतका सुंदर निसर्ग आपल्याला लाभला आहे. सुंदर किल्ले, त्यांचे भव्य बुरुज, तटबंदी, मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या काय काय सांगू ? पण, पण आज किल्ल्यांवर गेल्यावर चित्र काय दिसते तर गडावर केलेला प्लास्टिक चा कचरा, तत्बंदीच्या भिंतींवर लिहिलेली नवे, दारूच्या फुटलेल्या बाटल्या,पाण्याच्या टाक्यांमध्ये पडलेले प्लास्टिक..गडावर दारूच्या पार्ट्या करणे, आपली नावे कोरणे, नासधूस करणे यात कसले आलेय कर्तृत्व ? खरोखरच स्वतःबद्दल एवढा अभिमान असेल तर असे काहीतरी करून दाखवावे कि जग स्वतःहून तुमचे नाव काढेल.
आपल्या घरात आपण कचरा करतो का ? गोळी खाल्ल्यावर त्याचे प्लास्टिक तसेच कुठेतरी टाकतो का ? नाही ना..ते आपण कचरा पेटीतच टाकतो ना.मग बाहेर गेल्यावरच आपण घाण का करावी ? शहरात सुद्धा अशा गोष्टी आपल्या बाजूला सर्रास घडताना दिसतात.....रस्तावर थुंकणे , प्लास्टिक फेकणे अशा गोष्टी आता ' झालेल्या आहेत ..आणि असे करण्यात अगदी शिकली सवरलेली माणसे सुद्धा मागे नसतात..असो ...सांगायचे एवढेच कि घरात कचरा करत नाही , कुठेतरी थुंकत नाही , घराच्या भिंतीवर आपली नावे कोरत नाही मग बाहेर गेल्यावरच अक्कल गहाण का टाकली जाते ??? आपल्या सुदैवाने आपल्याला एवढा निसर्ग लाभलेला आहे , एवढे किल्ले आपल्या या महाराष्ट्रात आहेत , मग हा ठेवा जपणे हे आपले कर्तव्य नाही का ?
आपण काय काय करू शकतो ?
१) सर्वप्रथम आपण स्वतः दुर्गभ्रमण या क्षेत्राची ओळख करून घेणे .म्हणजे काय तर फिरायला सुरुवात करायची ...अर्थात , नवीन असताना एकट्याने साहस करू नये ..योग्य मार्गदर्शन ,सोबत घेऊनच सुरुवात करावी ..सुरुवातीला वाटेल कि डोंगर चढून जाऊन दगड धोंडे काय पहायचे ..पण एकदा वर गेल्यावर निसर्गाचं जे रूप न्याहाळायला मिळते , जो भन्नाट वारा
अंगावर घ्यायला मिळतो ते खूपच सुंदर असते ..एवढी तंगडतोड केल्याचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो ,शुद्ध हवा भरभरून प्यायला मिळते , डोंगरावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे ही एक वेगळीच नशा आहे ..हे स्व अनुभवावरून सांगू शकतो ..काही किल्ल्यांच्या वाटा कठीण असतात , वर जाईपर्यंत बऱ्याच अडचणींना तोंड देत जावे लागते ...असे प्रसंग आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करतात ..एकदा का फिरायला सुरुवात झाली कि कधी या निसर्गाच्या , किल्ल्यांच्या आपण प्रेमात पडतो समजत सुद्धा नाही ..मग हळूहळू याचे 'व्यसन ' जडत जाते ..अर्थात हे चांगलेच व्यसन आहे ..
२) नवीन नवीन मुला मुलींना या क्षेत्राची माहिती करून देणे ..त्यांना आपल्या सोबत घेऊन जाने ...भविष्यात त्यांच्यातून काही जण असे तयार होऊ शकतात कि जे या क्षेत्रात career करू शकतात ..
३) इतिहास , ऐतिहासिक चरित्रे , लढाया , दुर्गभ्रमण या विषयांवरची बरीच पुस्तके आज आपल्या सुदैवाने उपलब्ध आहेत ...ही पुस्तके वाचून आपण या विषयांबाबतचे आपले ज्ञान वाढवू शकतो ...
४) आपल्या आवडी -निवडी या विविध प्रकारच्या असू शकतात ..कोणाला फक्त निसर्गात भटकणे आवडते ...कोणाला पाने , फुले ,झाडे , पक्षी , प्राणी , फुलपाखरे यांची आवड असते ...तर कोणाला इतिहासाची ....दुर्ग -संवर्धन हा ही एक महत्वाचा विषय आहे .याची आज जास्त गरज आहे ....धासाल्णारे तट -बुरुज आधाराची वाट पाहतायत .....वरील विविध विषयांवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सहभागी होऊन आपण आपले योगदान देऊ शकतो ...

या व्यतिरिक्तही करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील ....आपल्याला आवडी आणि शक्यातेप्रमाणे जेवढे जमेल तेवढे आपण करावे ...खूप काही नाही करू शकलो तरी थोडेफार का होईना ' फुल ना फुलाची पाकळी ' म्हणून जी काही मदत होईल तशी करावी , हे ही नसे थोडके ...'किती केले ' यापेक्षा 'काय केले ' हे जास्ती महत्वाचे आहे , बरोबर ना ?

मार्च १९९७ , रंगपंचमी ....आजही आठवतो तो दिवस ..याच दिवसापासून दुर्ग भटकंतीला सुरुवात झाली ती आजतागायत सुरु आहे आणि जो पर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत सुरूच राहील ..१३ वर्षांमध्ये या गड -किल्ल्यांनी , या निसर्गाने जे प्रेम दिले आहे , जो आत्मविश्वास दिला आहे ते शब्दात मांडणे कठीण आहे ...मित्रहो , हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल ..हे प्रेम या पुढेही असेच कायम राहो किंबहुना वाढत जो हीच प्रार्थना !!!
एका कवितेच्या छान ओळी आठवल्या , त्याचा उल्लेख करावासा वाटतोय ,
रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी ,
हिरे माणके ही आम्हाला दुसरी दौलत नाही !!!

!!! जय भवानी , जय शिवाजी !!!